मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन फोन केले होते. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन, अशी धमकी या महिलेने दिली आहे. या महिलेकडून वारंवार फोन कॉल येऊ लागले आणि तिने धमकी दिली की, 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी करेन. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित महिला ही धनंजय मुंडे यांच्या परिचयाची असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी हे प्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवलं असून चौकशी सुरु आहे.




