मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंट आढळल्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सरसकट सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत.
डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील, तर त्यांना मागील दोन आठवड्यांतील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल.
हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी लागेल. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे, कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे, गर्दी होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रे तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणे आवश्यक आहे.
असे असतील नियम :
- अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत खुली राहतील.
- जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
- सर्व मॉल आणि थिएटर बंद राहतील.
- सोमवार ते शुक्रवार हॉटेल ५० टक्के क्षमतेने दुपारी दोनन वाजेपर्यंत खुली राहतील, त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील.
- लोकल आणि रेल्वे बंद राहतील.
- मॉर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत मुभा असेल.
- खासगी आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.
- स्टुडिओत चित्रीकरण परवानगी, मात्र, ते सोमवार ते शनिवार चित्रीकरण करता येईल.
- मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असणार. हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
- लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने, तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
- बांधकाम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा
- शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
- ई कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असेल.




