वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज दोन आठवड्यानंतर समोर आले आहेत. संजय राठोड यांनी आज याबाबत मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या आडून माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असं ते म्हणाले. राठोड यांनी आज पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे.
संजय राठोड यावेळी म्हणाले कि, “पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मात्र, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जातं आहे. हा प्रकार माझी सामाजिक, राजकीय, आणि वैयक्तिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे त्यात सर्व स्पष्टचं होईल. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. तसेच पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका,’ अशी विनंती त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले कि, “मी १५ दिवस गायब नव्हतो मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा. गेली ३० वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात काम केलं आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. एका घटनेमुळं मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका.”