मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तुर्तास थांबवा, असे आदेश दिले आहेत. जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत वीजबिलावरुन भाजपने आक्रमक पवित्र घेतला, बॅनर घेऊन सदस्य वेलमध्ये उतरले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “वीज बिलावर चर्चा करावी. इतर सर्व विषय बाजूला ठेवावे. राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. त्यांच्याकडून वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे. त्यामुळे तात्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं.”
विधानसभा अध्यक्षांनी हा विषय आधीच सरकारच्या विषय पत्रिकेवर असल्याने त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं सांगितलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत म्हटलं की हा विषय ऊर्जा खात्याचा आहे. त्यावर या सभागृहात चर्चा होणार आहे. तसेच जोवर विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरघूती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि आभार मानत ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे, त्यांचे कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावे, अशी मागणी केली.