मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या सुरक्षारक्षकांची कार होती. दरम्यान, एका मर्सिडीज कारचे नियंत्रण सुटल्याने तिने प्रथम एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार थेट अक्षय कुमार यांच्या सुरक्षारक्षकांच्या वाहनावर आदळली. ही धडक इतकी तीव्र होती की सुरक्षारक्षकांची कार रस्त्यावर पलटी झाली. पुढे अक्षय कुमार यांच्या गाडीला किरकोळ धक्का बसल्याचेही कळते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या ऑटो चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, अक्षय कुमार यांनी स्वतः त्यांच्या सुरक्षारक्षकांना जखमी ऑटो चालकाला त्वरित वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या घटनेचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केले असून ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही वेळानंतर अक्षय कुमार घटनास्थळावरून निघून गेले, मात्र त्यांचे सुरक्षारक्षक तेथेच थांबले होते.
या अपघातप्रकरणी अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. अपघात मर्सिडीज चालकाच्या चुकीमुळे झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अक्षय कुमार किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, सुरक्षारक्षकांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून जखमी ऑटो चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




