how you to keep good health in winter season

थंडीची चाहूल! हिवाळ्यात ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हिवाळ्याची चाहूल लागली असून थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल मानला जात असला तरी या ऋतूत आजार लवकर जडतात. थंडीचा प्रभाव प्रथम त्वचेवर, शरीरावर आणि क्रियाकलापांवर सुरू होतो. आपण सहसा उन्हाळ्यात कमी अन्न खातो, त्या तुलनेत हिवाळ्यात भूकही वाढते. या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा परिस्थितीत, सावधगिरी बाळगण्याची आणि अशा काही उपायांचा अवलंब करण्याची गरज असते जेणेकरून रोग तुमच्यापासून दूरच राहतील. हिवाळ्याच्या मोसमात स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण बघूया.

आहाराची विशेष काळजी : हिवाळ्याच्या ऋतूत खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते, कारण या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. जर तुम्ही धान्य (Whole grains), ओटमील इत्यादी खाल्ले तर ते वजन कमी करण्यासाठी आणि हृदयासाठी देखील फायदेशीर ठरतात.

  • या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.
  • तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा.
  • या ऋतूत तळलेले आणि सॅच्युरेटेड पदार्थ खाणे टाळावे.
  • विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना, अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे.
  • थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

थंडीपासून संरक्षण महत्त्वाचे : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा. या दरम्यान विशेषतः पाय, डोके आणि कान झाकून ठेवावेत. हिवाळ्यात किमान 6 ते 8 तास झोप घ्यावी. जसे थंडीच्या मोसमात शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे उबदार पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या मोसमात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण या ऋतूतील हवेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून हातात हातमोजे आणि चेहऱ्यावर स्कार्फ घालावा.

  • त्वचा कोरडी आणि शुष्क होऊ लागली, तर यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा वापर केला जाऊ शकतो.
  • या ऋतूमध्ये तुमच्या ओठांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ओठांवर उत्तम दर्जाचा लिप बाम लावावा.
  • हिवाळ्यात ओठांसोबतच तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडतात, त्यामुळे सूती मोजे घाला. रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावा.
  • सकाळी आणि संध्याकाळी थंडी जास्त असते, त्यामुळे या वेळेत विशेष काळजी घ्या.
  • प्रवासात पुरेसे उबदार कपडे घाला.
  • विनाकारण भिजणे टाळा. विशेषतः डोके बराच वेळ ओले ठेवू नका.

पाणी : हिवाळ्यात सहसा तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. हे टाळण्यासाठी थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहावे. यासोबतच काकडी, टरबूज, संत्री, टोमॅटो यांसारखे अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खावे.

व्यायाम महत्त्वाचा : शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर त्यासाठी हिवाळ्यापेक्षा चांगले हवामान दुसरे असूच शकत नाही. या दरम्यान तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवायला हवे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करता येत नसेल तर रोज फिरायला जाणे चांगले. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्त प्रवाह वाढतो.

या ऋतूत आंघोळीबाबत अनेक गैरसमज आहेत. काही लोक थंड पाण्याने तर काही गरम पाण्याने आंघोळ करण्याविषयी बोलतात. पण विनाकारण आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले. पाणी खूप थंड किंवा जास्त गरम नसावे.

वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी : सकाळच्या वेळी दाट धुके असते. थंड हवेमुळे घराबाहेर पडणे कठीण होते. अशा परिस्थितीत वृद्धांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • वृद्धांनी शक्यतो सूर्योदयानंतरच घराबाहेर पडावे. जर सकाळी खूप थंडी असेल तर दुपारी फिरायला जाण्याचा प्रयत्न करा.
  • थंडीच्या काळात खाण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेषतः शुगर असलेल्या रुग्णांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, मिठाई, चहा-कॉफीचा अतिरेक यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विशेषतः श्वसनाचे त्रास असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, तिथे त्यांचा त्रास खूप वाढू शकतो. लहान मुलांना देखील गर्दीत नेणे टाळावे, तेथे त्यांना संसर्गजन्य आजार जडण्याची शक्यता असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत