झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्याने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या प्रती महिना दीड लाखांमध्ये जेवण (५० हजार), औषधं (४५ हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (२० हजार), वकिलांची फी (२० हजार) आणि वाहतूक (१५ हजार) यांचा समावेश आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. २०१५ पासून तो जामीनावर बाहेर आहे. त्याला दाखवण्यापुरतं पाकिस्तानी जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. कारण रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असतानाही तो एका मुलाचा बाप झाला होता.
यूएन सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मालमत्ता गोठवण्यातून सूट मिळण्याच्या तरतुदी आहेत. असे म्हटले आहे की सदस्य देश (या प्रकरणात पाकिस्तान), जेथे योग्य असेल तेथे गोठविलेल्या निधी किंवा अन्य आर्थिक मालमत्ता किंवा आर्थिक संसाधनांमध्ये सूट मागू शकतो. त्यानंतर समिती निर्णय घेते.