मुंबई : एका सिगारेटसाठी नशेबाजाने पानटपरी चालकाची हत्या केली. ही घटना वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर गेट नंबर 18 येथे घडली. मुदस्सिर खान असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर नावाचा तरुण या ठिकाणी आला. आरोपी समीर खान (२२) याने मुदस्सिर याच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. परंतु आधीची उधारी असल्याने आणि सकाळची वेळ असल्यामुळे मुदस्सिर याने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात समीरने जवळच्या नारळ-पाण्याच्या दुकानातून चाकू उचलला आणि मुदस्सिर याच्यावर वार केले. बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेला मुदस्सिर याचा भाऊ आणि आईदेखील या हल्ल्यात जखमी झाले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. रक्तस्त्राव झाल्याने मुदस्सिर याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
निर्मल नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर आयपीसी कलम 2०२ (खून) आणि 7०7 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.