नवी दिल्ली : युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युक्रेनमध्ये रशियन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कीवमधील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यालयातून काम करत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी हे सांगितले आहे. त्यात त्यांनी आपले कार्यालयही दाखवले आहे. यामध्ये ते त्यांच्या ऑफिसमध्ये असल्याचे सांगत आहेत. आंद्रे बोरिसोविच देखील तिथेच आहे. येथून कोणीही पळून गेलेले नाही. यापूर्वी, रशियाच्या ड्यूमाचे स्पीकर व्हचेस्लाव वोलोडिन यांनी सांगितले होते की झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेले आहेत.
एजन्सीने अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही तोडगा निघणार असेल तर अमेरिका रशियाशी चर्चेसाठी तयार आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, जर रशियानेही असाच विचार केला आणि त्यांना प्रश्न सोडवायचे असतील तर अमेरिकेलाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला आवडेल.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी पाठवलेले विमान दिल्लीला पोहोचले असून त्यात बहुतांश विद्यार्थी आहेत. मुलांना पाहून घरच्यांचे डोळे पाणावले. भारताने आता तिथे अडकलेल्या आपल्या लोकांसाठी भारतीय हवाई दलाचा आधार घेतला आहे. या सर्वांना युक्रेनच्या शेजारील देशांतून मायदेशी आणले जात आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “रशिया दररोज सर्व प्रकारची सुमारे दोन डझन क्षेपणास्त्रे डागत आहे.”
भारताने हवाई दलाच्या मदतीने 16.5 टन मदत सामग्री युक्रेनला पाठवली आहे. ‘ऑपरेशन गंगा मिशन’ अंतर्गत आतापर्यंत 11,000 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी सुखरूप परतवण्यात आले आहे. आता भारतीय हवाई दलाची विमानेही या कामात गुंतली आहेत. भारतीय हवाई दलाचे C-17 विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या 210 भारतीय नागरिकांना रोमानियामार्गे शुक्रवारी रात्री उशिरा हिंडन एअरबेसवर घेऊन पोहोचले. भारतीय हवाई दलाच्या दहा विमानांद्वारे आतापर्यंत सुमारे 2056 लोकांना घरी आणण्यात आले आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कीवमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियाच्या लष्कराने शनिवारी युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला. दुसरीकडे, मॉस्कोने फेसबुक आणि काही परदेशी मीडिया वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. यामागे रशियाचा युक्तिवाद असा आहे की या वेबसाइट पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांदरम्यान खोट्या बातम्या चालवत आहेत. आपल्या सैन्याविरुद्ध शस्त्रे उचलणाऱ्यांना अटक केल्यास त्यांना युद्धकैद्यांचे हक्क मिळणार नाहीत, असेही रशियाने म्हटले आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.




