राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ते ६९ वर्षांचे होते. दसॉल्ट फ्रान्सच्या संसदेचे सदस्यदेखील होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना, फ्रान्सची सतत सेवा करणारं व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली. दसॉ यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी परिसराजवळ अपघात झाला.
ओलिवियर दसॉल्ट यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी सहा वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास) झाला. ते फ्रान्समधील उद्योगपती सर्ज दसॉल्ट यांचे पुत्र होते. ओलिवियर यांची कंपनी जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमानं तयार करते. मिळालेल्या माहितीनुसार, दसॉल्ट यांच्यासोबत असणाऱ्या हेलिकॉप्टरमधील चालकाचाही मृत्यू झाला.




