डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील करोना संकटाची माहिती देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. बाहेर गोळीबार होताच तिथे उपस्थित असलेल्या सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसनी ट्रम्प यांना या घटनेची माहिती दिली व त्यांना काही वेळासाठी व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातून बाहेर नेलं.
सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रम्प लगेचच पुन्हा मीडिया रुममध्ये आले व बाहेर गोळीबार झाल्याची माहिती दिली.
यूएस सीक्रेट सर्व्हिस या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गोळीबार करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तिला गोळी घालून जखमी करण्यात या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या जखमी व्यक्तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
स्वत: ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाल्याचं वृत्त दिलं आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसनेही गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.




