ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
“गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही”, अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.
अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आशालता यांच्या अचानक निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘आई माझी काळुबाई’ या टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान, आशालता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याशिवाय सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण बंद करण्यात आले असून या पुढचे चित्रीकरण मुंबईत स्टूडिओमध्ये केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.




