नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉकेज आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी दोन स्टेंट टाकून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. डॉ.अनन्या गुप्ता यांच्या मते, राजू श्रीवास्तव यांचे बीपी नियंत्रणात नाही. सहसा, अँजिओप्लास्टी केल्यानंतर, रुग्ण बरा होतो आणि त्याला वॉर्डमध्ये हलवले जाते. पण अँजिओप्लास्टीनंतरही राजू श्रीवास्तव यांचे बीपी ८०/५६ वरच आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना स्वतःहून श्वास घेता येत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
राजू श्रीवास्तव बुधवारी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये होते, यावेळी जिममध्ये वर्कआउट करत असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या. ट्रेडमिलवर धावत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. त्यांची तब्येत खराब झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचे करोडो चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.




