1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल. हे बदल बँक ग्राहक, कर आकारणीपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असणार आहेत. त्यामुळे हे होणारे बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.
MIS व्याजासाठी बचत खाते
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट (TD) मध्ये गुंतवणूक करण्याशी संबंधित नियम देखील बदलले आहेत. १ एप्रिलपासून या योजनांमधील व्याजाची रक्कम रोख स्वरूपात मिळणार नाही. यासाठी तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. पोस्ट विभागाच्या मते, अनेक ग्राहकांनी त्यांचे पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते त्यांच्या MIS, SCSS, TD शी लिंक केलेले नाही आणि अशा परिस्थितीत व्याज दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे ते लिंक करणे आवश्यक आहे.
जीएसटी नियम केले सोपे
CBIC (Central Board of Indirect Taxes and Customs) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-चलान (इलेक्ट्रॉनिक चलन) जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे.
Axis बँकेने किमान शिल्लक मर्यादा वाढवली
Axis बँकेत पगार आणि बचत खाती असलेल्या ग्राहकांसाठी नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहेत. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केली आहे. AXIS बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो/अर्बन सिटीमध्ये बचत खात्याची मर्यादा बदलण्यात आली आहे. बँकेने मोफत रोख व्यवहाराची (Free Cash Transaction) विद्यमान मर्यादा बदलून 4 मोफत व्यवहार किंवा 1.5 लाख रुपये केली आहे.
पीएफ खात्यावर कर
CBDT ने 1 एप्रिल 2022 पासून आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 (Income-tax (25th Amendment) Rule 2021) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. याच्या वर योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
सिंगापूरने कोविड नियम केले शिथिल
सिंगापूरने 1 एप्रिलपासून येथे येणाऱ्या परदेशींसाठी कोविड नियम सोपे केले आहेत. ज्यांनी कोविड लसीचा पूर्ण डोस घेतला आहे त्यांच्या आगमनानंतर त्यांची चाचणी केली जाणार नाही. सिंगापूर मार्गे वाहतूकही पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू होईल.




