राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील भाखारसर पोलीस स्टेशन अंतर्गत सुजो का निवान गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मांत्रिकाने अल्पवयीन मुलीला आगीत जिवंत जाळून स्वतः देखील त्या आगीत उडी मारल्याने या दोघांचा मृत्यू झाला. मांत्रिकाचे नाव किस्तूराराम असून तो सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आला होता.
ज्या मुलीला मांत्रिकाने जाळले तिचे वय १० वर्षे होते. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले कि, त्यांची मुलगी मंजू तिच्या मामाच्या मुलीबरोबर अर्धा किलोमीटर दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून परत येत असताना मांत्रिक किस्तूरारामने अल्पवयीन मंजूचा हात धरला आणि त्या खड्ड्यात उडी मारली, खड्ड्यामधील गवताचा पेंढा त्याने पेटवला. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. मंजूबरोबरची तिच्या मामाची ८ वर्षाची मुलगी घरी गेली आणि तिने याबाबत माहिती दिली.
बातमी कळताच तिचे कुटुंब घटनास्थळी पोहचले परंतु तोपर्यंत दोघांचेही भाजून निधन झाले होते, पोलीस घटनास्थळी पोहोचले. किस्तूरारामच्या कुटूंबाची चौकशी केली असता किस्तूरारामचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.