पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथे वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार झाल्यामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी दावा केला की मुख्य आरोपी हा तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याचा मुलगा आहे, त्याला पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीच्या पालकांनी घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी हंसखळी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ब्रजगोपाल उर्फ सोहेल गयाली याला प्रथम ताब्यात घेण्यात आले आणि नंतर काल रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला सोमवारी राणाघाट न्यायालयात नेण्यात करण्यात आले. त्याच्यावर बलात्कार, खून आणि पुरावे दडपण्याव्यतिरिक्त POCSO कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रारीनुसार, मुलगी सोमवारी दुपारी आरोपीच्या घरी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती, परंतु ती अस्वस्थ अवस्थेत घरी परतली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
‘जबरदस्तीने अंत्यसंस्कार’
मुलीच्या आईने पत्रकारांना सांगितले कि, “आमच्या मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि ती स्थानिक TMC नेत्याच्या मुलाच्या घरी झालेल्या पार्टीतून परत आल्यावर तिला पोटात तीव्र वेदना होत होत्या. आम्ही तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनाक्रमावरून आणि पार्टीत उपस्थित लोकांशी बोलल्यानंतर आमची खात्री झाली आहे की तिच्यावर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केला होता. तिचे मृत्यू प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वीच काही लोकांनी पीडित मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी जबरदस्तीने नेला, असा आरोपही त्यांनी केला. कुटुंबाने असाही आरोप केला आहे की या गटाने सुरुवातीला मुलीला कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा खाजगी आरोग्य सुविधांमध्ये नेऊ नका आणि त्याऐवजी तिच्यावर स्थानिक ‘क्वॅक’ द्वारे उपचार करा असा इशारा दिला होता.
स्थानिक तृणमूल पंचायत नेते समरेंद्र गयाली यांचा मुलगा ब्रजगोपाल गयाली याच्या वाढदिवसाच्या समारंभात या अल्पवयीन मुलीला आमंत्रित करण्यात आले होते. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबियांना सुरुवातीला सांगण्यात आले की मुलगी पार्टीमध्ये “आजारी पडली” आहे आणि तिला एका क्वॅक डॉक्टरकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
यावर प्रतिक्रिया देताना, वरिष्ठ TMC नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री, शशी पंजा म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाकडून अल्पवयीन आणि महिलांवरील अत्याचाराला शून्य सहनशीलता आहे. या घटनेवर राजकारण होता कामा नये. तपास करून पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस शक्य ते सर्व प्रयत्न करतील.
विरोधी पक्ष भाजपने सोमवारी हंसखळी पीएस भागात १२ तासांचा निषेध बंद पुकारला आहे. पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा तनुजा चक्रवर्तीही या कुटुंबाला भेट देणार आहेत. वकिलांचा एक गट देखील सोमवारी सकाळी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करणार आहे आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपासाठी विनंती करणार आहे.




