Deputy Chief Minister Ajit Pawar
कोरोना महाराष्ट्र

मोठा निर्णय – किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार; ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत, राज्यातील रुग्णालयात उपलब्ध खाटांचा, ऑक्सिजन तसेच रेमिडिसिव्हीर औषध पुरवठ्याचा आढावा घेतला. येणाऱ्या काळात इतर राज्यात रुग्णवाढ झाल्यानंतर महाराष्ट्राला बाहेरुन मिळणारा ऑक्सिजन कमी पडण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातंच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्रकल्प स्थापन झाले आहेत. मुंबई महापालिकेनेही अशा प्रकल्पनिर्मिती संदर्भात कार्यवाही सुरु केली आहे. या तिघांनी विहित प्रक्रियेद्वारे खरेदी केलेल्या दरांना प्रमाण मानून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांसाठी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामुळे निविदा प्रक्रियेतील विलंब टाळता येईल व प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजननिर्मिती वाढवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

राज्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमिडिसिव्हीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमिडिसिव्हिर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत