मुंबई : लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल. तसेच खासगी रुग्णालयांतून देखील आता कोरोना लस देण्यात येणार आहे. तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, कोरोना प्रतिबंधासाठी लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल.
आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी असे लसीकरणाचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून वृद्ध तसेच सहआजाराच्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. एकूण १० हजार सरकारी सुविधा व २० हजार खासगी रुग्णालये त्यासाठी सज्ज करण्यात आली आहेत. असे केंद्रीय आरोग्य राजेश भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या दूरसंवाद बैठकीत स्पष्ट केले होते.
कोरोना लस 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी
कोविन अॅप २.० नाव नोंदणी प्रक्रिया :
- नावनोंदणी करण्यासाठी ‘कोविन’ अॅपच्या नव्या आवृत्तीत ‘जीपीएस’ची सुविधा.
- कोविन अॅप’च्या मदतीने नावनोंदणी, लसीकरणाची वेळ निश्चित करता येईल.
- मोबाइल नंबर नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्याचा ‘ओटीपी’ तयार होईल.
- त्याच खात्यावर कुटुंबातील इतरांची नोंदणी करता येईल.
- परराज्यातून आलेल्या व्यक्तींना ती सध्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात लस घ्यावी लागेल.
- जे थेट नावनोंदणीसाठी लसीकरण केंद्रात येतील त्यांना स्वयंसेवक मदत करतील.




