नवी दिल्ली : भारताने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. ३१ मार्चच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर बंदीची मुदत वाढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) दिली आहे.
आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि कुरिअर सेवा मात्र सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. तसेच वंदे भारत मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. तसेच २७ देशांसोबत एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. ज्या देशात जायचे आहे त्या देशाने संबंधित प्रवाश्याविषयी हरकत घेतली नसेल आणि प्रवासाच्या २४ ते ७२ तास आधी केलेल्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असेल तरच प्रवासाची परवानगी आहे.
विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोणत्या परिसरातून निघालो आणि विमानातून उतरल्यानंतर शेवटी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास जाणार त्याची माहिती विमानतळावर जाहीर करण्याचे बंधन आहे. एखाद्या प्रवाशाला कोरोना झाल्यास तो कोणा-कोणाच्या संपर्कात आला हे शोधणे सोपे व्हावे यासाठी ही माहिती जाहीर करण्याचे बंधन आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आवश्यकतेनुसार होम क्वारंटाइन आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन यांची तरतूद आहे. क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करण्याचे बंधन प्रवाशांना लागू आहे.




