भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली.
बलराम भार्गव म्हणाले कि, “भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. अशा प्रकारची पुनर्संसर्गाची भारतात तीन प्रकरणं समोर आली असून यांतील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, “४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. अनेकदा तरुण वर्ग हा विचार करतो की आपल्या कमी वयामुळे आपलं आरोग्य चांगल आहे, त्यामुळे संसर्ग होणार नाही किंवा ते लवकर बरे होतील. मात्र, लोकांमध्ये असा समज निर्माण होण्यापासून त्यांना रोखलं पाहिजे. भारतात करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ८७ टक्के लोक करोनातून बरे झाले आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली.




