4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता त्याविरुद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दिवस कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. जगात दरवर्षी कर्करोगाने 80 लाख रुग्ण मृत्यू पावतात. भारतातही ही संख्या खूप मोठी आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्याची जबाबदारी समाज आणि सरकार या दोघांची आहे. जर भारताला जगात महासत्ता बनवायचे असेल तर तरुण पिढी ही निरोगी असायला हवी.कर्करोगाचे मुख्य कारण व्यसन हेच आहे, हे अनेक संशोधनातून सिद्ध झालेले आहे. तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, दारू इ.गोष्टींचे सेवन केल्यामुळे कर्करोग होतो. व्यसनामुळे कर्करोग होतो हे माहीत असूनही भारतात व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात विशेषतः तरुणांचे प्रमाण खूप मोठे आहे. लहान वयातच तरुण व्यसनाकडे आकर्षित होतो व व्यसनांना बळी पडून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी करून घेतो.
व्यसनाची सवय लहान वयात मित्रांमुळे जास्त प्रमाणात लागते. जास्त काळ तंबाखू,मावा, गुटखा खाणाऱ्या मित्रांच्या सहवासात घातल्यावर मित्रांच्या आग्रहास्तव,मज्जा म्हणून किंवा आपणही खाऊन पाहू काय होते या जिज्ञेसेपायी हळूहळू व्यसनांची सुरुवात होते, त्यानंतर तो मुलगा कधी व्यसनांच्या आहारी जातो हे त्यालाही समजत नाही. व्यसन हा एक आजार आहे, व्यसनामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व परिणामी त्यांना कमी मार्क पडतात. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो व त्यातूनच सहजच चालू केलेल्या व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढत जाते. अनेकदा कमी मार्कामुळे एक तर मुलगा बेरोजगार असतो किंवा त्याला चांगली नोकरी मिळत नाही त्याला पडेल ते अंग मेहनतीचे काम करावे लागते व तो मानसिक दृष्टया नैराश्याने गुरफटला जातो, या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी तो दारु, तंबाखू, मावा, गुटखा या व्यसनांचा आधार घेतो व व्यसनाच्या या चक्रव्युवाहात अडकून जातो.तसेच चांगली नोकरी असणारे ही पैसा असल्यामुळे विरंगुळा म्हणून किंवा मित्रांच्या आग्रहाखातर दारुच्या एक पेग पासून सुरुवात करतात व एक खंब्यापर्यंत कधी पोहचतात हे त्यांनाही कळत नाही. चांगली नोकरी असली तरी नोकरीतील चढ उतार, कामाचं टेन्शन किंवा वरिष्ठांचा दबाव अशा अनेक कारणांमुळे माणूस मानसिक दृष्टया नैराश्याने ग्रासला जातो व व्यसनाकडे आकर्षित होतो. एकदा माणूस व्यसनांच्या चक्रव्यूहात अडकला तर यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. व्यसनाच्या आहारी न जाता प्रत्येकाने स्वत: ला व्यसनांपासून चार हात दूर ठेवायला पाहिजे. व्यसनामुळे माणूस स्वतः बरोबरच सर्व परिवाराचे मानसिक संतुलन बिघडवतो, यातूनच कौटुंबिक कलह वाढत जाऊन कुटुंब देशोधडीला लागतात.
व्यसनांमुळे जीभेचा,तोंडाचा,घशाचा,आतड्यांच्या, फुफ्फुस इत्यादींचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. एकदा कर्करोगाने गाठले तर यातुन बाहेर पडणे खूप अवघड होते. एखाद्याला कर्करोग झाला आहे असे समजते तेंव्हा तो मानसिक दृष्टया पूर्णपणे खचून जातो. मी स्वत: गेल्या पंधरा वर्षापासून व्यसन करत होतो व त्याचा परिणाम मला भोगावा लागला. व्यसन सोडण्याविषयी घरातील व बाहेरील बरेच जण आग्रह करत होते. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्याचा परिणाम मला स्वतः ला अडीच वर्षांपूर्वी व्यसनांमुळे जीभेचा कर्करोग झाला होता. जीभेचे ऑपरेशन करून कर्करोगाची गाठ काढून टाकली. परंतु अडीच वर्षानंतरही मला ज्या वेदना होतात त्या मी शब्दात सांगु शकत नाही. व्यसनामुळे पैशाबरोबरच शारीरिक हानी खूप मोठ्या प्रमाणात होते, जी कधीही भरून निघू शकत नाही. आयुष्यभर आपल्याला त्या वेदनांचा सामना करावा लागतो. समाजाचा व्यसनी लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. व्यसनामुळे माणूस समाजातील स्वतःची पद, प्रतिष्ठा गमावून बसतो. व्यसनांमुळे तुम्ही तुमचे दु: ख क्षणिक काळासाठी विसरु शकता. परंतु कायमस्वरुपी कोणत्याही संकटावर मात करु शकत नाहीत. उलट व्यसनांमुळे सहजासहजी सुटू शकणा- या समस्या उग्र रुप धारण करु शकतात.
आपण व्यसन सोडण्याचा निश्चय केला तर अशक्य अजिबात नाही, आपण या भूमिकेवर ठाम रहायला हवे. आपण व्यसनांचा वेळीच त्याग केला नाही तर व्यसन आपल्याला कुटुंबापासून, समाजापासून दूर घेऊन जाईल, याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. व्यसनांमुळे होणा- या दुष्परिणामांना मी स्वतः सामोरे जात असुन आपणावर ही वेळ येऊ नये ही कळकळीची विनंती. त्यामुळे व्यसनाच्या आहारी न जाता योग्य वेळी मित्रांना नकार द्यायला शिका किंवा व्यसनी लोकांपासून चार हात दूर रहायला शिका.. तरच आपण व आपले कुटुंब निरोगी व समाधानी आयुष्य जगू शकतो. ‘व्यसनमुक्त जीवन, आनंदी जीवन’ हाच सुखी आयुष्याचा खरा मूल मंत्र आहे. कर्करोगमुक्त जीवनासाठी सर्वांना शुभेच्छा.
– दत्तात्रय साठे, अ.नगर | ७०८३७६७८००