court order
अमरावती महाराष्ट्र

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, न्यायालयाने ठोठावली कठोर शिक्षा…

अमरावती : अमरावतीमध्ये बडनेरा येथील एका कंत्राटी टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली तरुणीशी अश्लील वर्तन केले होते. त्याने कोरोना चाचणी करण्यासाठी संबंधित तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा प्रकार समोर आला होता. या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. या तरुणीचा स्वॅब घेतेवेळी तिच्याशी अश्लील कृत्य करणारा आरोपी अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२४ जुलै २०२० रोजी या प्रकरणातील पीडिता कार्यरत असलेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळे स्टोअरमधील २० कर्मचाऱ्यांना २८ जुलै रोजी दुपारी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर हॉस्पिटल येथे कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी अल्केश देशमुख हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे तोंडाद्वारे स्वॅब घेण्याची जबाबदारी होती. यावेळी अल्केशने पीडितेसह तिची मैत्रिण व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले.

दरम्यान, सर्वांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याने पीडितेला तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तुझा आणखी एका ठिकाणचा स्वॅब घेऊन टेस्ट करावी लागेल, असे म्हटले. पीडितेने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. यानंतर अल्केश या दोघींनाही आतमधल्या खोलीमध्ये घेऊन गेला. त्याने पीडित तरुणीच्या शरीरातील खासगी अवयवातून स्वॅब घेण्याचे अश्लील कृत्य केले. त्यानंतर पीडिता ही आपल्या कार्यस्थळी परत आली.

पीडितेच्या मनात या प्रकाराबाबत संशय आल्याने पीडितेने तिच्या भावाला माहिती देऊन चौकशी करायला लावली. त्यानुसार भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नाक किंवा तोंडाव्यतिरिक्त कोरोना चाचणीसाठी इतर कोणतीही चाचणी होत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. पीडितेने त्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अल्केशविरुद्ध बलात्कार, विनयभंग यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील अ. देशमुख यांनी युक्तीवाद केला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने अल्केश देशमुख याला १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत