नागपूर : नागपुरात एका कोरोना बाधित महिलेने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. वर्धा मार्गावरील एम्स हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन रेणुका रमेश अलघटे (वय ४५) नावाच्या महिलेने आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका अलघटे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्यातच त्यांना प्रकृती खालावल्याने ३ मे रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पाचव्या मजल्यावर कोविड केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांनी मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले आणि गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.




