नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना तुम्ही याप्रकरणी हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करत त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. सिंह यांच्यावतीने अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. तसेच याप्रकरणावर उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी करावी, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.




