मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं.”
संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत म्हटले की मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. तसेच याबाबत शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असे राऊत यांनी सांगितले.




