इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान शनिवारी (दि.१३) चेन्नईहून दिल्लीकडे निघाले होते. परंतु मेडिकल इमर्जन्सीमुळे विमान अचानक नागपूरमध्ये उतरवण्यात आलं. मात्र, तरीदेखील दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानात छोटूसिंह नारायण (६५) हे प्रवास करत होते. विमानाने दिल्लीसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांनी त्याबद्दल विमानातील कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर तात्काळ विमान नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. त्या प्रवाशाला लगेच इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (GMCH) दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.




