कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नड स्पर्धक जयश्री रमैया यांचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला आहे. आज (25 जानेवारी) जयश्रीचा मृतदेह बंगळुरूमधील पुनर्वसन केंद्रात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती.
जयश्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जयश्रीने सोशल मीडियावरही अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर ती चर्चेत आली होती. जयश्रीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की ती डिप्रेशनची शिकार आहे आणि तिला माघार घ्यायची आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मी निरोप घेते! जग आणि उदासीनतेला गुड बाय’ जयश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती. मात्र, यानंतर अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत सांगितले की ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तिने स्वतःला सावरले होते.
जयश्री रमैया बिग बॉस कन्नड सीझन 3 मधील स्पर्धक होत्या. बर्याच सहभागींपेक्षा जयश्रीला रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर जास्त कामाच्या संधी मिळाल्या नव्हत्या. रिपोर्ट्सनुसार, जयश्री कामाच्या संधी न मिळाल्याबद्दल नाखूष होती आणि तिने तिच्या मित्र-मैत्रिणींकडे याबद्दल अनेकदा तक्रार केली होती. आज तिचा मृतदेह आढळून आल्याने शोक व्यक्त केला जात आहे.




