पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील माळवाडी, गोकुळ नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धावपळ उडाली.
दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्फोटात लागलेली आग विझवण्याचे काम सुरू केले. यामध्ये जखमी झालेल्या दोन व्यक्तींना पोलिसांच्या मदतीने तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची नावे मोहन माणिक चव्हाण (वय ४३) आणि अतिश मोहन चव्हाण (वय २३) आहेत.
गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरातील सर्व सामान आणि भांडी फुटली असून संपूर्ण घर उद्धवस्त झालं आहे. संपूर्ण घराची स्थिती फारच गंभीर होती. स्फोटात गॅस सिलेंडरचे सर्व भाग वेगळे झाले आणि घरातील सर्व पत्रेही पूर्णपणे उडाले आहेत. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. घटनेचा तपास सुरू असून गॅस सिलेंडरच्या स्फोटाची सखोल चौकशी केली जात आहे.




