नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.२५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे रेपो दर ६.५० वरून ६.२५ टक्क्यांवर आला होता. त्यानंतर आज (९ एप्रिल) झालेल्या कपातीनंतर ते ६ टक्क्यांवर आले आहे.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरांची घोषणा केली. या कपातीमुळे आता वाहन कर्ज आणि गृहकर्जावरील व्याजदरात कपात दिसून येईल. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण सादर केले. त्यांनी या काळात महागाई कमी झाल्यावर समाधान व्यक्त केले. पतधोरण समितीच्या सर्व सदस्यांनी महागाई लक्षित प्रमाणापेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. त्याआधारेच रेपो दरात कपातीचा निर्णय घेण्यात आला. जर गरज असेल आणि वातावरण अनुकूल असेल तर येत्या काळात रेपो दरात अजून कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फेब्रुवारी महिन्यापासून कपातीचे धोरण राबवण्यात आले आहे. सलग दुसर्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली.
RBI ने व्याजदर तर कमी केला…आता ईएमआय कमी करण्यासाठी बँकेत जावे लागेल का? जाणून घ्या आवश्यक माहिती
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सध्या भडकलेल्या टॅरिफ वॉरबाबत चिंता व्यक्त केली. सध्याची परिस्थिती जगासाठी योग्य नसल्याचे ते म्हणाले. मात्र तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी विश्वास वर्तवला. या परिस्थितीत सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड सुरूच राहील असे ते म्हणाले.