पुणे : पुण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अंकिता शेंडकर (वय 26) आणि डॉ. निखिल शेंडकर (वय 28) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगरमध्ये राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक गल्ली क्रमांक 2, आझाद नगर येथे होते तर निखिल दुसरीकडे प्रॅक्टिस करत होता. काल रात्री घरी परतत असताना या दोघांचे फोनवर भांडण झाले होते. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास जेव्हा निखिल घरी पोहोचला, तेव्हा अंकिताने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिने बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं होतं.
अंकिताला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर अंकिताचा मृतदेह तिच्या भावाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, पत्नीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे निखिलने गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.




