छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (5 ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समीर शर्माने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसंच सध्या राहत असलेलं घर त्याने फेब्रुवारी महिन्यात भाड्याने घेतलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं.
समीर शर्माच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
समीर शर्माने ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर, ये रिश्ते है प्यार के या मालिकांमध्ये काम केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी तो आजारी होता. परंतु आजारपणातून बरा होऊन त्याने मालिकेत पुनरागमनही केलं होतं. सध्या तो स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत कुहूच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत होता.




