चेन्नई : इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता तातिनी रामाराव (टी. रामाराव) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेजगतात शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
टी रामाराव यांचे वयाशी संबंधित आजाराने निधन झाले. आजारी पडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. रामाराव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (२० एप्रिल) संध्याकाळी चेन्नई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Deeply saddened to know about the demise of veteran filmmaker & a dear friend Shri #TRamaRao ji. I had the privilege of working with him in #AakhriRaasta and #Sansaar!! He was compassionate, commanding & had a great sense of humour. My condolences to his family! Om Shanti! ?♿️ pic.twitter.com/k66KwN8ymT
— Anupam Kher (@AnupamPKher) April 20, 2022
टी रामाराव यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगातील अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चन, श्रीदेवीपासून ते एनटीआर आणि एएनआरपर्यंत त्यांनी भारतातील अनेक टॉप स्टार्ससोबत काम केले आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अंधा कानून, नाचे मयुरी, नवरात्री, ब्रह्मचारी, इल्लालू, पांडनी जीवनम आणि सामना यांचा समावेश आहे.
बॉलीवूडमध्ये त्यांनी 1979 पासून काम सुरु केले. त्यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, संजय दत्त, अनिल कपूर, गोविंदा आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या अनेक स्टार्ससोबत काम केले. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘जुदाई’, ‘जीवन धारा’, ‘एक ही भूल’, ‘इन्क्लाब’, ‘इन्साफ की पुकार’, ‘वतन के रखवाले’, ‘दोस्ती दुश्मन’, ‘नाचे मयुरी’, ‘जॉन जानी जनार्दन, ‘रावणराज’, ‘मुकाबला’, ‘हातकडी’ आणि ‘जंग’ यांचा समावेश आहे. .
रामाराव यांनी ‘मद्रास मूव्ही’ ट्रेंड सुरू केला ज्यामध्ये दक्षिणेकडील प्रॉडक्शन हाऊसद्वारे निर्मित हिंदी चित्रपट पारंपारिक हिंदी चित्रपट बाजारात यशस्वी व्यावसायिक प्रस्ताव म्हणून उदयास आले. रामाराव यांना भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या पश्चात पत्नी तातिनेनी जयश्री आणि मुले चामुंडेश्वरी, नागा सुशीला आणि अजय असा परिवार आहे.




