मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १९१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक २८ चेंडूत ६२ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ५० धावा केल्या. तर बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या. जडेजाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक झळकावले.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७४ धावा केल्या. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रैनाने फाफसह चांगली भागीदारी केली. पण १११ धावांवर अगोदर रैना २४ धावांवर तर फाफ ५० धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ३ बाद १११ अशी झाली. अंबाती रायडू ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला.
अखेरच्या षटकात जडेजाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटकात १९१ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले आणि चेन्नईला या सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली. त्याने २३ चेंडूत अर्धशतक केले. जडेजाने अखेरच्या षटकात ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले.