legendary runner Milkha Singh infected with corona

महान युगाचा अंत! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

क्रीडा देश

चंडीगड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ॲथलिट आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना मोहालीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली होती. काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिल्खा यांचे पूत्र गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. मिल्खा यांच्या पत्नी माजी व्हॉलिबॉलपटू निर्मल कौर यांचे गेल्या रविवारी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांना मुलगा जीव यांच्याव्यतिरिक्त तीन मुली डॉ. मोना सिंग, अलीझा ग्रोव्हर, सोनिया सांवालका आहेत.

मिल्खा सिंग यांचे विक्रम

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात दबदबा होता. मिल्खा सिंग यांनी त्या काळी जगाला क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी भाग पाडले होते. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही शर्यत केवळ २१.६ सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे.”

निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन

काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंग पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत