लखनौ : लखनौच्या इंदिरा नगरमधील एक तरुणी 10 दिवसांपासून तिच्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याचे आढळून आले. 26 वर्षीय अंकिता दीक्षित असे या मुलीचे नाव असून ती एका खोलीत होती, तर तिच्या आईचा मृतदेह दुसऱ्या खोलीत पडलेला होता. शिवाय तिने आपल्या आईच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबातील कोणालाही माहिती दिली नव्हती.
घरातून विचित्र वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी दाखल झालेल्या लखनौ पोलिसांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधून निवृत्त झालेल्या सुनीता दीक्षित यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सुमारे 10 दिवस जुना असल्याचे समजते.
सुरुवातीला पोलिसांनी निवासस्थानात प्रवेश केला असता मुख्य दरवाजाला कुलूप असल्याचे दिसून आले. पण त्यांना एका महिलेचा आवाज आला. पोलिसांनी दरवाजा ठोठावला असता, मृत महिलेची २६ वर्षीय मुलगी अंकिता दीक्षित हिने दार न उघडता विरोध सुरू केला. दुसरा पर्याय नसल्याने पोलिसांनी सुताराला बोलावून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी पाहिले की, अंकिता एका खोलीत होती आणि तिची आई दुसऱ्या खोलीत पडली होती. अंकिताची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात आले.
मुलीला खोलीत पाहून पोलीस चक्रावून गेले. मुलगी जास्त बोलू शकत नव्हती आणि काही प्रश्नांनंतर ती मृत सुनीता दीक्षित यांची मुलगी असल्याचे आढळून आले. सुनीता यांचा मृतदेह सुमारे 10 दिवस जुना असल्याचे समजते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर त्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
मात्र, महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत एचएएल अभियंता सुनीता यांनी 10 वर्षांपूर्वी पती रजनीश दीक्षित यांच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यादेखील कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि त्यांची 26 वर्षांची मुलगी त्यांच्यासह राहत होती.
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, मोठा भाऊ रागावल्यामुळे १८ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या
मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, 20 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…




