ठाणे: एकनाथ शिंदे यांनी आता ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईत शिवसेनेला धक्के बसत असतानाच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर म्हस्के यांच्यासह 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. आता ठाण्यातील एकूण 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत.
काल (बुधवारी) मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. शिवसेना शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांचा राजीनामा पक्षाला मोठा धक्का आहे. शिवसेना शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भरच पडत आहे. नाराज शिवसैनिक तसेच शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.




