मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन सोशल मीडियात आणि देशाच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परप्सर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, बरं समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?
महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करुन त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये? असे प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. हाथरसमधील घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की, काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशआ प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.




