दिल्ली : पेटीएम लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं, “लघुउद्योजकांना 5 लाख रुपयांपर्यंत देत ‘कोलॅटरल फ्री लोन’ योजनेचा विस्तार केला जात आहे. यासह कमी व्याज आणि हप्त्यांमध्ये कर्जफेड या सुविधाही दिल्या जातील.
पेटीएम लेंडिंगचे कार्यकारी अधिकारी (सीईओ) भावेश गुप्ता म्हणाले, कोलॅटरल फ्री लोनसाठी आम्ही किराणा स्टोअर आणि इतर लघुउद्योजकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. या उद्योजकांना पारंपारिक बॅकिंग क्षेत्र मागेच सोडून देते, कर्ज देत नाही. त्यामुळे मुख्य बँकांकडून सुटलेल्या आणि ज्यांना सहज कर्ज मिळत नाही अशा लघुउद्योजकांना हे कर्ज दिलं जाईल.
कर्जासाठी व्यापाऱ्यांची पात्रता त्यांच्या दैनंदिन व्यवहारांनुसार ठरवली जाणार आहे. पेटीएमने कर्ज देण्याच्या प्रक्रियेला डिजिटल केलं आहे. यात कर्जासाठी अर्ज करताना किंवा वितरणाला मंजूरी मिळण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची अथवा गॅरंटीची गरज असणार नाही. पेटीएमने म्हटलंय, कर्जाची मर्यादा मुख्यतः व्यापारातील व्यवहारांसाठी असणार आहे. या कर्जावर कोणतीही अधिकची शुल्क आकारणी नसेल.