नवी दिल्ली : १६ ऑगस्ट रोजी एक तरुण आणि एका तरुणीने सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरुण – तरुणी दोघंही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या घटनेतील पीडित तरुणीने उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर तरुण या प्रकरणाचा साक्षीदार होता.
पीडित तरुणी आरोपांवर सुनावणी न झाल्याची तक्रार करत आपल्या एका मित्रासह सर्वोच्च न्यायालयाबाहेर आली होती. १६ ऑगस्ट रोजी या दोघांनी फेसबुक लाईव्ह करत स्वत:ला पेटवून घेतलं होतं. सर्वोच्च न्यायालयाजवळ उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेनं तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत गंभीररित्या जखमी झालेल्या या दोघांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, आज संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे.
वाराणसीच्या लंका स्टेशनमध्ये १ मे २०१९ रोजी अतुल राय यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघाचे बसपाचे खासदार अतुल राय यांच्यासहीत पोलिसांवर दोन्ही पीडितांनी गंभीर आरोप केले होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राय जिंकून आले होते. बलात्कार प्रकरणात तुरुंगात बंद असलेले बसपा खासदार अतुल राय यांना खासदारपदाची शपथ घेण्यासाठी उच्च न्यायालयाने दोन दिवसांची पॅरोल मंजूर केली होती.




