मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये वडिलांनी रागाच्या भरात मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवृत्त लष्करी जवान तेज बहाद्दूर सिंह यांच्या मुलानं लाईट बिल भरण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलाची गोळ्या घालून हत्या केली.
छतरपूर जिल्ह्यातील नौगावमधील आर्मी कॉलनीमध्ये राहणारे तेज बहाद्दूर सिंह यांनी आपला मुलगा सत्येंद्र सिंह बघेल (वय 40) याला लाईट बिल भरण्यास सांगितलं. परंतु, त्याने बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे तेज बहाद्दूर यांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट गोळ्या झाडून मुलाची हत्या केली. सत्येंद्रला त्याच्या नातेवाईकांनी गावातील हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. किरकोळ कारणातून वडिलांनी मुलाची हत्या केल्यानं गावातील अनेकांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तेज बहाद्दूरला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.




