मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. मोबाईल चार्ज करताना पॉवर बँक फुटून जोरदार स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे छताचे पत्रे देखील तुटले. घराच्या भिंतींवरही स्फोटांच्या खुणा आहेत. या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही घटना मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. 28 वर्षीय तरुण राम साहिल सकाळी 7.30 वाजता पॉवर बँक वरून मोबाईल चार्ज करीत होता. यावेळी मोबाइल तरुणाच्या हातातच होता. यादरम्यान अचानक पॉवर बँक फुटली आणि घरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे छताचे पत्रे तुटून गेले. तसेच भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले. हा तरुण गंभीर जखमी होऊन जागेवर कोसळला. कुटुंबियांनी जखमी तरूणाला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही पॉवर बँक कोणत्या कंपनीची होती, याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. उल्लेखनीय म्हणजे उमरिया हा मध्यप्रदेशातील एक मागासलेला जिल्हा आहे. अशा ग्रामीण भागात नेहमी विजेचा प्रश्न असतो. त्यामुळे गावातील लोक मोबाइल चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा वापर करतात.




