केरळ : केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे, जो संयुक्त अरब अमिरातीहून 6 जुलै रोजी राज्यात पोहोचला आहे. केरळमधील मंकीपॉक्सचे तिन्ही रुग्ण यूएईमधून परतलेले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 35 वर्षीय व्यक्ती ६ जुलैला देशात परतली होती आणि तीन दिवसांनी त्या व्यक्तीला ताप आला.
जॉर्ज यांनी सांगितले की, 15 जुलै रोजी लक्षणे दिसल्यानंतर त्याला मंजेरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले. तिन्ही बाधितांची प्रकृती स्थिर असून राज्यात दुय्यम संसर्गाची नोंद झाली नसल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडून चाचणी किट मिळाल्यानंतर राज्याने अलापुझा येथील एनआयव्हीच्या प्रादेशिक केंद्रात मंगळवारी मंकीपॉक्सची चाचणी सुरू केली. आरोग्य विभागाने राज्यातील चारही विमानतळांवर स्क्रीनिंग डेस्क उभारले असून विशेषत: मध्यपूर्वेतील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.




