बनिहाल : जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. एका नवजात मुलीला म्हणजेच जन्मानंतर लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला दफन केल्यानंतर लगेचच सुमारे एका तासाच्या आत कबरीतून जिवंत बाहेर काढलं.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला होता आणि तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर मुलगी चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आंदोलनं केलं. त्याची दखल घेत प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्थानिक सरपंच मंजूर अल्यास वाणी यांनी सांगितले की, ही मुलगी बशारत अहमद गुजर आणि शमीना बेगम यांची आहे. हे दाम्पत्य रामबन जिल्ह्यातील बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी आहेत. नॉर्मल प्रसूतीद्वारे सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात मुलीचा जन्म झाला. मुलीला मृत घोषित करण्यात आलं आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी पाहिलं नाही, त्यानंतर कुटुंबाने तिला होल्लान गावात दफन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावं लागलं. जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले, त्यानंतर कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी श्रीनगरला पाठवले, या घटनेनंतर, कुटुंब आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांच्या अव्यावसायिक वृत्तीच्या विरोधात आंदोलन केलं. बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ राबिया खान यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही स्त्रीरोग विभागात काम करणार्या कनिष्ठ कर्मचारी नर्स आणि सफाई कामगारांना तत्काळ निलंबित केले आहे. तपासणीनंतर तपशीलवार माहिती सामायिक केली जाईल, असे डॉ. खान यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात वृद्ध महिलेने केली पतीची मदत, उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन




