पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक मदनदास देवी यांचे सोमवारी वयाच्या ८१ व्या वर्षी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मंगळवार 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती संघाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह या पदावर होते.
बेंगळुरू येथील राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रोत्थान हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे ५.०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी अंत्यसंस्कारासाठी पुण्यात नेण्यापूर्वी त्यांचे पार्थिव केशव कृपा या स्थानिक संघ मुख्यालयात दुपारी 1.30 ते 4 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि मदन दास देवी यांच्या दीर्घ सहवासाचे स्मरण केले. “मदन दास देवी जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. माझा त्यांच्याशी जवळचा सहवास तर आहेच, पण त्यांच्याकडून मला नेहमीच खूप काही शिकायला मिळाले. या दुःखाच्या काळात सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो. ओम शांती!” असे ट्विट त्यांनी केले.
श्री मदन दास देवी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने अपना पूरा जीवन राष्ट्रसेवा में समर्पित कर दिया। उनसे मेरा न सिर्फ घनिष्ठ जुड़ाव रहा, बल्कि हमेशा बहुत कुछ सीखने को मिला। शोक की इस घड़ी में ईश्वर सभी कार्यकर्ताओं और उनके परिवारजनों को संबल प्रदान करे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2023




