पुणे : कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. अद्यापही कोरोनावरील उपचार सापडले नसल्याने काळजीचे वातावरण आहे. भारतात सध्या कोरोनाची आकडेवारी घसरती असली तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनावरील लशीसाठी जगभरात प्रयत्न सुरु असले तरी अद्याप यश आले नाहीये. अशातच कोरोनावरील लशीपेक्षा आधी कोरोनावरील औषध येईल अशी माहीती मिळाली आहे. याबाबतची माहीती सीएसआयआरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राम विश्वकर्मा यांनी दिली आहे.
सीएसआयआरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राम विश्वकर्मा यांनी म्हटले की, पहिल्या दोन टप्प्यातील निष्कर्ष चांगले असून ते सकारात्मक आहेत. या निष्कर्षांना नियामकांसमोर ठेवलं असता त्यांनी आता तिसऱ्या टप्प्यासाठी मंजूरी दिली आहे. देशात जवळपास 300 लोकांवर लवकरच हे परिक्षण सुरु होणर आहे. एम्स, अपोलोसहीत काही निवडक हॉस्पिटल्समध्ये या परिक्षणाची तयारी केली जात आहे. जर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाली तर पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच हे औषध बाजारात येण्याची शक्यता आहे. हे औषध इम्यूनो थेरपीच्या रुपात काम करेल जी उपचार घेणाऱ्या रुग्णाला दिली जाऊ शकते. तसेच निरोगी व्यक्तीला वाचवण्यासाठी दिली जाऊ शकते.
दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हा निष्कर्ष निघाला आहे या औषधाचे सेवन करणारे रुग्ण लवकरात लवकर बरे होत आहेत. त्यांच्यामधील व्हायरस लोड गतीने कमी होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल एम्ससहीत काही निवडक हॉस्पिटलमध्ये होईल. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 42 रुग्णांवर झाली होती. तिसऱ्या टप्प्यात 300 लोकांवर परिक्षण केले जाणार आहे. हे औषध कुष्ठरोगासाठी आधीपासूनच वापरले जाते. सीएसआयआरने या औषधाला कोरोनासाठीही वापरले आहे. त्यामुळे असे वाटते आहे की लशीपेक्षा आधी कोरोनावरील औषध येईल.