नवी दिल्ली : टिळक नगर येथील ८७ वर्षीय आजारी वृद्ध महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्या भागात काम करणारा 30 वर्षीय सफाई कामगार आरोपी असल्याचे समजले आहे. पोलिसांना सीसीटीव्हीवरून आरोपीचा सुगावा लागला. दिल्ली पोलिसांनी ट्विट करून हे प्रकरण १६ तासांत सोडवल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात घुसलेल्या एका व्यक्तीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप वृद्ध महिलेने केला होता. यानंतर त्याने हल्ला करून मोबाईल हिसकावून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वृद्ध महिलेची मुलगी (६५) मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेली होती, त्यावेळी ही घटना घडली.
The case of sexual assault of elderly lady in Tilak Nagar has been solved.
Culprit in this blind case nabbed within 16 hours. Victim’s mobile phone recovered from him.
Accused lives in nearby locality and works as a sweeper.@ANI@PTI_News@DCPWestDelhi#DelhiPoliceUpdates— Delhi Police (@DelhiPolice) February 15, 2022
पोलिसांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत काहीही सांगितले नाही आणि केवळ मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आजूबाजूच्या काही लोकांनी समजूत घातल्यानंतर सोमवारी त्यांनी संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली आणि त्यानंतर या प्रकरणात बलात्काराचे कलमही जोडण्यात आले. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणीही करवून घेतली आहे.
दरम्यान, याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना जाब विचारला आहे. याआधी महिलेच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस पीडितेच्या कुटुंबाला सहकार्य करत नसून बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता. पोस्टमध्ये म्हटले आहे की, वृद्ध महिलेने अत्याचाराचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पीडित महिलेला काही जखमाही झाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला आपल्या 60 वर्षीय मुलीसोबत घराच्या दुसऱ्या मजल्यावर एकटीच राहते. रविवारी दुपारी पीडित महिलेची मुलगी घराजवळील पार्कमध्ये गेली होती, त्याच दरम्यान कोणीतरी घरात घुसून वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेचे वय जास्त असल्याने आणि तिची प्रकृतीही चांगली नसल्याने वैद्यकीय तपासणीदरम्यान तिला जास्त त्रास होणार नाही आणि तिला घरापासून दूर नेले जावे लागणार नाही याची काळजी घेण्यात आली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.




