नवी दिल्ली : भारतातील 18 वर्षांवरील सर्वांना या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारने देशातील डिसेंबरपर्यंतच्या लस उपलब्धतेचा संपूर्ण रोडमॅप सादर केला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत देशात एकूण 51.6 कोटी डोस उपलब्ध होतील. यापैकी सुमारे 17 कोटी डोस अगोदरच देण्यात आले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 216 कोटी डोसचे उत्पादन केले जाईल. हे देशातील 18 वर्षांवरील 95 कोटी लोकांच्या लसीच्या दोन्ही डोसपेक्षा कितीतरी जास्त असेल.
खास गोष्ट म्हणजे हे सर्व लसीचे डोस आपल्या देशामध्ये तयार केले जातील आणि आयात केलेल्या लसींचा यात समावेश नाही. देशातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्ष सरकारवर जोरदार टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर नीति आयोगाचे सदस्य आणि लसीवर आधारित टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पाल म्हणाले की, लसीची उपलब्धता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि येत्या काही महिन्यांत त्याचे परिणाम दिसून येतील. टीकाकारांच्या टीकेला उत्तर देताना डॉ. पाल म्हणाले की, त्यांनी हे विसरू नये की भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे ज्यांनी 17. 5 कोटीपेक्षा अधिक डोस दिले आहेत आणि हे यश देशात बनवलेल्या लसीच्या आधारे मिळवले आहे.
चीनच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, आतापर्यंत फक्त अमेरिकेने लसीचे 25 कोटी डोस दिले आहेत. खरं तर अमेरिकेने भारताच्या एक महिना अगोदरच लस देणे सुरू केले. अमेरिकेसारख्या समृद्ध देशाला १७ कोटी डोस द्यायला 115 दिवस लागले, तर मर्यादित संसाधने असूनही भारताने ते 114 दिवसात करून दाखवले.
सध्या उपलब्ध लस आणि भविष्यातील रोडमॅपची माहिती देताना डॉ. पाल म्हणाले की भारत सरकारने आतापर्यंत एकूण 35.6 कोटी डोसची ऑर्डर दिलेली आहे. त्यात २७.६ कोटी डोस कोविशील्डचे आणि ८ कोटी डोस कोवॅक्सिनचे आहेत. या सर्व डोसचा पुरवठा जुलैपर्यंत होईल. तसेच, राज्ये आणि खासगी क्षेत्रानेही जुलैपर्यंत कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या 16 कोटी डोसची ऑर्डर दिलेली आहे. हे दोन्ही मिळवले तर जुलैपर्यंत भारतात एकूण 51.6 कोटी डोस उपलब्ध होतील. त्यातून 25 कोटी लोकांना दोन्ही डोस मिळू शकतात.
स्पुटनिक-व्ही लस पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल
डॉ. पाल यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टनंतर देशात लसीची कमतरता पूर्णपणे दूर होईल. केवळ सीरम संस्थाच ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान दरमहा सरासरी 15 कोटी कोविशील्ड डोस या हिशोबाने ७५ कोटी डोस पुरवेल. दरम्यान, भारत बायोटेक दरमहा 11 कोटी डोसच्या हिशोबाने कोव्हॅक्सिनचे 55 कोटी डोस पुरवेल. म्हणजेच या दोन्ही लसींचे 130 कोटी डोस उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त स्पुटनिक-व्ही भारतात दाखल झाली असून येत्या आठवड्यापासून मर्यादित प्रमाणात आयातित डोस बाजारात मिळायला सुरुवात होईल. स्पुटनिक-व्ही भारतात लस उत्पादनाच्या तयारीत असून जुलैपासून त्याचे उत्पादन सुरू होईल. स्पुटनिक-व्ही चे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 15.6 कोटी डोस मिळतील.
वेगवेगळ्या टप्प्यावर पाच नवीन लसीची चाचणी
डॉ. पाल यांनी पाच नवीन लसींविषयी आणि त्यांच्या संभाव्य उत्पादनाविषयी देखील सांगितले, ज्या चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत. यामध्ये बायोलॉजिकल ईची सब-युनिट लस, झायडस-कॅडिलाची डीएनए लस, सीरम इन्स्टिट्यूटची नोव्हावॅक्स, भारत बायोटेकची नोजल लस, जिनोव्हाच्या एमआरएनए या लसीचा समावेश आहे. त्यापैकी झायडस-कॅडिलाच्या डीएनए लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि तातडीच्या वापरासाठी त्यांनी परवानगीही मागितली आहे.
जर तिला परवानगी मिळाली तर ती ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान पाच कोटी डोस पुरवण्यास सक्षम असेल. त्याचप्रमाणे बायोलॉजिक ई लस तिसऱ्या टप्प्यातील अंतिम फेजमध्ये आहे. आपत्कालीन वापरास अनुमती मिळाल्यास ते 30 कोटी डोस पुरवू शकते. परवानगी मिळाल्यास ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भारत बायोटेकने नोजल लसीचे 10 कोटी डोस, सीरम इन्स्टिट्यूटने नोव्हावॅक्सचे २० कोटी डोस आणि जिनोव्हाने एमआरएनए लसीचे 6 कोटी डोस पुरवण्याची ग्वाही दिली आहे.




