नवी दिल्ली : सोमवारी, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या उपक्रमाची चेष्टा करण्यात आली, दिवा लावण्याच्या उपक्रमाची अनेकांनी खिल्ली उडवली, अशा संकटाच्या काळात तरी विरोधकांनी राजकारण करू नये.
राष्ट्रपतींचं अभिभाषण मार्ग दाखवणारं ठरलं आहे. संपूर्ण विश्व संकटांचा सामना करत आहे. कोरोना संकटाचा कुणी विचारही केला नसेल अशा काळात आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. विरोध जरूर करावा त्यासाठी अनेक मुद्दे आहे. मात्र देशाचं मनोबल तोडणारा विरोध नको”, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेस देशाला नेहमी निराश करते. भारताची लोकशाही स्वार्थी आणि आक्रमक नाही. भारतात विदेशातून विक्रमी गुंतवणूक होत आहे. गरिबीमुक्त भारतासाठी प्रयत्नशील आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक जगानं पाहिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली असून त्यांना कर्जमाफी मिळत नाही’. निवडणुका आल्यावर कर्जमाफीचा मुद्दा येतो. कृषी मंत्र्यांनी केलेल्या प्रश्नाला कुणी उत्तर देत नाही. शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर सर्वांचं मौन आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
कृषिमंत्री सतत शेतकऱ्यांशी बोलत असतात. एकमेकांच्या बोलण्याला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणार्यांना आम्ही विनंती करतो की आंदोलन करणे हा आपला हक्क आहे. पण वृद्ध लोक तिथे बसले आहेत, ते योग्य नाही. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. तुम्ही आंदोलन संपवावं, पुढे जाण्यासाठी आपण एकत्र चर्चा करू. मी सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण देत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.




