पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना, आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ ची सुरूवात करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात आणखी एक आणि अतिशय मोठे असे अभियान सुरू होत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आता तुमची प्रत्येक तपासणी, प्रत्येक आजार, तुम्हाल कोणत्या डॉक्टरने कोणते औषध दिले, कधी दिले, तुमचे रिपोर्ट काय होते ही सर्व माहिती या एकाच हेल्थ आयडीमध्ये असेल.
या मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा खासगी मेडिकल अहवाल असणार आहे. ज्यामध्ये संबंधिताने कोणत्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करायची आहे याबाबत सर्व माहिती दिलेली असणार आहे. तसेच, वैद्यकीय संस्था आणि टेस्ट मेडिकल काउन्सिलला डिजिटल स्वरूप देण्याची या मिशन अंतर्गत योजना आहे.
सर्वप्रथम हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजिटल डॉक्टर व आरोग्य सुविधा यामध्ये रजिस्टर केल्या जातील. त्यानंतर ई-फार्मसी आणि टेलीमेडिसीन सेवा देखील यामध्ये असणार आहे. यासाठी विशेष मार्गदर्शकप्रणाली बनवली जाणार आहे.
या मिशन अंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती एकाच अॅपवर उपलब्ध होईल.
हे अॅप डाउनलोड करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. ज्यानंतर तुम्हाला एक हेल्थ आयडी मिळेल.
याद्वारे होणारे उपाचार व तपासण्यांची संपूर्ण माहिती डिजिटली साठवावी लागेल, जेणेकरून याची नोंद ठेवली जाईल.
जेव्हा तुम्ही कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे उपचार घेण्यास जाल, तेव्हा तुम्हाला सर्व कागदपत्रं किंवा रिपोर्ट्स घेऊन जाण्याची गरज नसेल.
डॉक्टर कुठूनही तुमच्या युनिक आयडीद्वारे तुमचा सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल पाहू शकतील.
तसेच यावर रजिस्ट्रेशन करणे ऐच्छिक असणार आहे. परंतु नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.




