तेलंगणा : तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लागली. येथे इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे शोरूममधील सहा जण जिवंत जळाले. तेथे काही लोक जखमीही झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला. शोरूमच्या वर एक लॉज देखील आहे, तेथील लोकांचा देखील धुरामुळे श्वास गुदमरला गेला. यानंतर लोकांनी इमारतीवरून उडी मारून आपला जीव वाचवला. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना इमारतीबाहेर काढले. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि 12 जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की राज्य सरकार ही घटना कशी घडली याचा तपास करत आहे. ते म्हणाले की अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला, तर काहींना वाचवण्यात यश आले.



